एपीआय कॉर्नर परिसरात फायरिंग
प्लॉटिंग व्यावसायिकावर झाडल्या गोळ्या
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) किरकोळ वादातून दोघांवर गोळीबार झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. एपीआय कॉर्नर ते कलाग्राम रस्त्यावर थांबलेल्या प्लॉटिंग व्यवसायीकावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौफिक शफिक पठाण (३०, रा. कमळापूर, वाळूज एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली.
२२ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास तौफिक शफिक पठाण मित्र निसार जब्बार खान (रा. मिसारवाडी) यांच्यासोबत चिकलठाणा परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. तिथून निघताना फिर्यादीच्या (एमएच २० एफसी ७०००) कारसमोर गणेश औताडे दारू
पिऊन लघुशंका करत असल्याने त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, गणेशसोबतच्या मित्रांनी हा वाद सोडविला. त्यानंतर फिर्यादी निघाले. निसारची (एमएच २० डीजी ०४५०) कार पुढे आणि फिर्यादी तौफिक यांची कार मागे होती. दोघेही कलाग्राममार्गे प्रोझोनच्या दिशेने कमळापूरला जात असताना निसार यांनी रत्नप्रभा मोटर्सजवळ कार थांबविली. फिर्यादी कारमध्येच होते. काच उघडी ठेवून ते निसार यांच्याशी बोलत होते. त्याचवेळी अचानक एपीआये कॉर्नरकडून स्कुटीवर तिघे आले.
त्यातील पाठीमागे बसलेला स्कुटी थांबवून कारजवळ आला. यावेळी लघुशंकेसाठी उतरलेल्या निसार यांनी त्याला पाहताच फिर्यादीला गाडी निकाल असा जोरात आवाज
देत ते स्वतःची कार सोडून फिर्यादीच्या कारमध्ये बसून निघाले. त्याचवेळी एकाने गोळी झाडली, हे पाहताच निसार आणि तौफिक मागे सरकले. गोळी त्यांच्या कानाजवळून गेली आणि बंद काचेवर लागली. आरोपींनी निसार यांच्या कारच्या काचाही फोडल्या. दोघेही फिर्यादी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गेले असता हद्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याची असल्याने त्यांना तेथे जाण्यास सांगितले. दरम्यान, गस्तीवरील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी त्यांना एमआयडीसी सिडको ठाण्यात बोलविल्यानंतर दोघेही गेले. दरम्यान, तिघांविरोधात पहाटे तीनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक भरत पाचोळे करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions